हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा पुणे या दोन्ही जिल्ह्यातील नोकरदार वर्ग तसेच नागरिक एसटी प्रमाणे रेल्वेचाही प्रवासासाठी वापर करतात. मात्र, पुढील ९ दिवस पुणे-सातारा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. नीरा-लोणंद स्थानकादरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी विविध तांत्रिक कामे करण्यात येत आहेत. यासाठी दि. १२ ते २१ ऑक्टोबरदरम्यान काही रेल्वे गाड्या रद्द, काही गाड्यांचे मार्ग अंशतः रद्द व काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. नवरात्र व दसऱ्याच्या काळात रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
पुणे विभागात पुणे – सातारा रेल्वे मार्गावरील नीरा-लोणंद स्थानकादरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी विविध तांत्रिक कामांसाठी दि. १२ ते २१ दरम्यान काही पॅसेंजर व डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-फलटण, लोणंद-फलटण व पुणे-सातारा या डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दि.२१ व २२ ऑक्टोबर रोजी सुटणारी पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस कोल्हापूर ते सातारापर्यंतच धावेल. त्यामुळे ही गाडी पुणे-सातारा-पुणे अशी रद्द राहील.
दि. २२ रोजी सुटणारी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून नियमित वेळेऐवजी दोन तास उशिरा म्हणजेच सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी सुटेल. तर कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून नियमित प्रस्थानाऐवजी अडीच तास उशिरा म्हणजे सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. ब्लॉकमुळे १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान सुटणारी कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेसही विलंबाने धावेल. दि.२१ ऑक्टोबर रोजी चंदीगडहून सुटणारी चंदीगड यशवंतपूर एक्स्प्रेस पुणे ते सातारादरम्यान विलंबाने धावणार आहे.