पुण्यात ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन:राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या धक्कादायक रित्या वाढत आहे. यातही राज्यात पुणे-मुंबई सारखी शहरे ही रुग्णसंख्या वाढीत आघाडीवर आघाडीवर आहेत. पुण्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर मात्र अतिरिक्त ताण पडताना दिसतो आहे. पुण्यातील योग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील ऑक्सिजन पुरवठा संपल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत बोलताना डॉ, अभिजित दरक म्हणाले की, ‘ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी एका रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही लिक्विड ऑक्‍सिजनच्या अभावामुळे संघर्ष करीत आहोत सध्या 11 रुग्ण आमच्याकडे व्हेंटिलेटर वर आहेत. आमच्याकडे फक्त एका तासाचा पुरवठा शिल्लक आहे’. अशी माहिती दरक यांनी दिली आहे.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले ‘आमच्याकडे 14 आयसीयू बेड आणि 23 ऑक्सिजन बेड आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी २० ऑक्सीजन सिलेंडर पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. पण ते कधी पोहोचेल याची माहिती रुग्णालय प्रशासनाला नाही. जर ते सिलेंडर पोहोचले तर आणखी तीन ते चार तास राहू शकतात’.

राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्याने केंद्राकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑक्सीजन सिलेंडर बाबत मागणी केली होती. राज्य सरकार रुग्णांपर्यंत ऑक्सीजन सिलेंडर पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. केंद्र सरकारनेही मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.मात्र प्रत्यक्षात ती मदत गरजूंपर्यंत पोहचणे महत्वाचे आहे.

You might also like