कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील संवर्धन राखीव वनक्षेत्रात बुधवारी (दि. 28) रात्री वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात वाघाने केलेल्या शिकारीसोबत आढळून आला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे दर्शन झाले असून व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित झाल्याचेही दिसून येत आहे. बुधवारी रात्री शिकार केल्यानंतर वाघ वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सह्याद्री व्याघ्रच्या कॉन्झर्वेशन रिझर्व्ह क्षेत्रात वाघाचे दर्शन घडल्याचे छायाचित्र वन विभागाने प्रसिद्धीस दिले आहे. वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात काल रात्री वाघाचे छायाचित्र टिपल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे.सह्याद्री पर्वतरांगातील आठ वनक्षेत्रांना कॉन्झर्वेशन रिझर्व्हचा दर्जा दिल्यानंतर प्रथमच त्या भागात वाघाच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाला आहे.
सह्याद्रीच्या पट्ट्यात साताऱ्यातील जोर, जांभळीच्या खोऱ्यासह विशाळगड, पन्हाळा, गगनबावडा, आजरा, भुदरगड चंदगडसह आंबोली ते दोडामार्ग या आठही वनपट्ट्यांना कॉन्झर्वेशनचा दर्जा दिला आहे. त्यामुळे सह्याद्री पर्वतरांगातील वाघांचा भ्रमण मार्ग सुरक्षित राहणार होता. तो सुरक्षित आहे, याचाच पुरावा वाघाच्या छायाचित्राने दिला आहे. वन विभागाला संरक्षित वनक्षेत्रामध्ये वाघाचा वावर आढळला अशी माहिती मिळाली. त्यानुसार वन विभागाने व्याघ्र प्रकल्पात गोपनीयरित्या कॅमेरे लावले. त्यातील काल रात्री एका कॅमेऱ्याने नर वाघाचे छायाचित्र टिपले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. बेन क्लेमंट यांनी दिली. वाघाचे छायाचित्र त्याने केलेल्या शिकारीबरोबर टिपले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.