कराड । कराड येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. किरण गरुड यांचे वयाच्या 54 व्या वर्षी रविवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कराड तालुक्यातील येणके हे त्यांचे मूळ गाव होते.
डॉ. किरण गरुड यांनी वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर कराड येथे गरुड नर्सिंग होम सुरु केले. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे आणि सर्वांना सहकार्य करणाऱ्या डॉ. गरुड यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
डॉ. गरुड यांचे येणके गावातील सामाजिक आणि विकासकामात मोठे योगदान आहे. कराडसह परिसरात त्यांच्या वैद्यकीय कामाची ख्याती होती. डॉ. गरुड यांच्यावर येणके येथे रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.