कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड नगरपालिकेने सध्या शहरात केलेल्या पाहणीत हेरिटेज व मोठ्या वृक्षांचेही नुकसान वीज कंपनीने केलेले आहे. या झाडांची फांद्या तोडणे किंवा नुकसान करण्याचा अधिकार वीज कंपनीला नाही. यासाठी कोणतीही नगरपालिकेची परवानगी घेतलेली नाही. याबाबत वीज वितरणने खुलासा न केल्यास त्यांना प्रत्येक वृक्षाच्या नुकसानीस एक लाखाचा दंड करण्यात येणार आहे. पालिकेच्या हद्दीतील झाडांची वीज कंपनीने मोठ्या प्रमाणावर परवानगी न घेता नुकसान केले असून त्याचा दंड अंदाजे 3 ते 5 कोटीच्या घरात जात असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.
वीज कंपनीला नोटीस बजावून पालिका दंडाची आकारणी करणार आहे. नगरपालिकेच्या हद्दीतील झाडे तोडण्याचा कोणताही अधिकार नसताना झाडांचे नुकसान केले आहे. त्या संदर्भात नगरपालिका व वीज कंपनी यांच्यात वाद सुरू झाला आहे. वीज कंपनीने केवळ 8 लाखांच्या एका महिन्याच्या थकीत वीज बिलापोटी पालिकेच्या मुख्य कार्यालयासह पंपिंग स्टेशनचे वीज कनेक्शन तोडल्याने खळबळ उडाली होती. पालिकेच्या सभेत वीज कंपनीचा निषेध करून त्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली. त्यात राजकारण झाल्याचाही आरोप होत आहे.
पालिकेने वृक्षांचे नुकसान केल्याचा व दंड आकारणीचा दावा वीज कंपनीने फेटाळून लावत झालेली वृक्षतोड कायदेशीर असल्याचे प्रत्युत्तर दिले. त्यावर पालिकेने वीज कंपनीने काम करताना वृक्ष तोडण्याची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. विनापरवाना वृक्षांच्या फांद्या तोडल्या आहेत. स्टेशन रस्ता, वाखाण रस्ता, शिवाजी हाउसिंग सोसायटी या भागात तब्बल 300 हेरिटेज व मोठ्या वृक्षांच्या फांद्या तोडल्या आहेत, त्याशिवाय मुख्य बाजारपेठेसह पेठनिहाय सर्व्हे सुरू आहे. ज्या भागात सर्व्हे झाला आहे. त्याबद्दल प्रति वृक्ष एक लाख रुपयांप्रमाणे 3 ते 5 कोटींचा दंड वीज कंपनीकडून आकारला जाणार आहे.