सातारा | लोणंद बस स्थानकात महिला बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व सहकाऱ्यांनी या गुन्ह्याबाबत सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे संशयितांनी वापरलेली कार व तीन संशयित निष्पन्न करून त्यांना अटक केली आहे. त्यांनी 16 चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून, लोणंद पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेले 10 तोळे सोन्याचे दागिने व कार असा एकूण 15 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, लोणंद बस स्थानकात महिला बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी झाले होते. लोणंद पोलिस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे संशयितांनी वापरलेली कार व हौसाबाई नामदेव कांबळे (वय- 45, रा. उदगीर, जि. लातूर), हारणाबाई बाबू सकट (वय-65, रा. आनंदनगर, देगणूर, जि. नांदेड), नरसिंग कोंडीबा बन (वय- 38, रा. गांधीनगर, ता. उदगीर) या तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी उदगीर, लातूर येथून कारमधून येऊन लोणंद, वाई, औरंगाबाद, कवठे- महाकाळ (सांगली), सांगली शहर, नाशिक, ओतूर (पुणे), लोणीकंद (पुणे) या पोलिस ठाणे हद्दीत एकूण 16 चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
लोणंद पोलिसांनी या संशयितांकडून चोरी केलेले एकूण 10 तोळे सोन्याचे दागिने व कार असा एकूण 15 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने व स्वाती पवार, संतोष नाळे, अतुल कुमार, श्रीनाथ कदम, सर्जेराव सूळ, अमोल पवार, फय्याज शेख, अभिजित घनवट, अविनाश शिंदे, केतन लाळगे, प्रमोद क्षीरसागर, चालक विजय शिंदे, विठ्ठल काळे, प्रिया दरगुडे, अश्विनी माने, तसेच उदगीरचे पोलिस अंमलदार पुलेवाड यांनी केला आहे.