पुणे प्रतिनिधी | किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून जावयाने सासूचा खून केल्याची घटना पुण्याच्या औंध येथील संजय गांधी वसाहत परिसरात घडली आहे. हि घटना आज बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
सुदामती देवराम गायकवाड (६०, रा. संजय गांधी वसाहत) असे मयत महिलेचे नाव असून दिगंबर ओव्हाळ (वय ४५ ) असे त्या महिलेचा खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सासूचा खून केल्या प्रकरणी जावयाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर चतुंश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी दिगंबर ओव्हाळ याचे या आधी पहिले लग्न झाले होते. तर सुदामती गायकवाड यांच्या मुली सोबत त्याचे दुसरे लग्न झाले होते. सुदामती गायकवाड या आपल्या मुलगी आणि जावया सोबत औंध येथील लमाण तांडा परिसरात राहत होत्या. त्या माळकरी होत्या. जावई दारू पीत असे आणि मांस खात असे यावरून सासू आणि जावयाची रोज भांडणे होत असत. अशातच जावई दारू पिवून घरी आल्यास सुदामती त्याला घरात घेत नव्हत्या. दिल्या जाणार्या अशा वागणुकीचा जावयाच्या मनात राग साठल्याने त्याने आज बुधवारी तिन वाजण्याच्या सुमारास किरकोळ वादातून सासूची हत्या केली आहे.