सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
अंत्री खुर्द तालुका शिराळा येथील ४२ वर्षीय पुरुष मुंबई येथून १७ मे रोजी आला आहे. या व्यक्तीची मुंबई येथे स्वॅब तपासणी करण्यात आली होती. आता त्याला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र स्वॅब घेतला असताना त्याला क्वारंटाईन करण्याऐवजी मुंबईतून बाहेर जाण्यासाठी पास कसा दिला? असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित व्यक्तींनेही आपला स्वॅब घेण्यात आल्याची माहिती लपवली. दरम्यान या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे. जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण सापडला, मात्र खानापूर तालुक्यातील साळशिंगेमध्ये अहमदाबादमधून आलेली महिला मंगळवारी कोरोनामुक्त झाली. त्यामुळे सद्यस्थितीत रुग्णांची संख्या २० च राहिली.
अंत्री खुर्दमध्ये नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून आलेल्या ४२ वर्षीय पुरुष मुंबई येथून १७ मे रोजी आला होता. गावात आल्यानंतर त्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्या व्यक्तीची मुंबई येथे स्वाब तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. हा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून तालुका आरोग्य अधिकारी यांनी सदरची व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची खात्री करून घेतली आहे. या व्यक्तीला मिरज येथे आयसोलेशन कक्षात आणण्यात येत असून या व्यक्तीची मिरज कोवीड लॅब येथे पुनश्च स्वाब घेऊन खात्री करण्यात येणार आहे. तसेच निकटवर्तीयांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. व अनुषंगिक उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथे गुजरातमधील अहमदाबाद येथून पती-पत्नी आली होती. या महिलेसोबत गुजरातमधून आलेल्या अन्य लोकांच्या संपर्कामुळे साळशिंगे, गव्हाण आणि भिकवडी खुर्दमधील 5 जणांना कोरोनाची लागण झाली. या महिलेची प्रकृती ठणठणीत असल्याने तिची कोरोना चाचणी घेण्यात आली होती, तिचा अहवाल निगेटिव्ह आल्याने कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे ५५ रुग्ण आढळले आहेत, त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ३३ जण कोरोनामुक्त रुग्ण झाले होते. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात २० कोरोनाचे रुग्ण असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साळुंखे यांनी सांगितले.