औरंगाबाद – औरंगाबाद शहरात राज ठाकरे यांची सभा होणार असून त्यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. रिपब्लिक युवा मोर्चाचे जयकिसन कांबळे यांनी ही याचिका दाखल केली असून 1 मे रोजी राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे होणार आहे.
राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भात काही निर्देश देण्यात यावेत तसेच त्यांची औरंगाबादेतील सभा होऊ नये आणि झालीच तर सभेचं थेट प्रक्षेपण करण्यात येऊ नये या मागण्यांसह याचिका औरंगाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आली असून यावर आज सुनावणी होणार असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं आहे. तसेच ही सभा होऊ नये हीच आमची मूळ मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे हे जाणूनबुजून आणि मुद्दाम दोन समाजात जातीय तेढ निर्माण करत असतील तर ही सभा थांबवण्यात यावी. दोन समाजात तेढ निर्माण झाला तर वाद होऊ शकतो, दंगल होऊ शकते. गृहमंत्री वळसे पाटलांनी सुद्धा या प्रकरणावर मिटींग घेतल्या आहेत तसेच हा वाद निर्माण होऊ नये यासाठी आम्ही याचिका दाखल केली असल्याचं याचिकाकर्ते जयकिसन कांबळे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान राज ठाकरे यांनी मागच्या दोन सभेतील भाषणाविरोधात बेताल वक्तव्य निर्माण केलं आहे. त्यांच्या भाषणात वारंवार हिंदू मुस्लीम असे मुद्दे येत असतात. आता रमजानचा सण जवळ येत असून त्यांच्या तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यावरुन दंगलसुद्धा होऊ शकते म्हणून आम्ही याचिकेमध्ये राज ठाकरे यांचं भाषण तपासून घेण्यात यावं अशी मागणी केली असल्याचं याचिकाकर्ते जयकिसन कांबळे यांनी सांगितलं.