हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात ट्रकचालक आणि वाहतूकदारांचा संप सुरू असल्यामुळे बहुतांश ठिकाणी पेट्रोल पंपावरील डिझेल आणि पेट्रोल संपले आहे. राज्यात संप सुरू असल्यामुळे पंपापर्यंत पेट्रोल आणि डिझेल आणण्यासाठी ट्रकचालक आणि वाहतूकदार उपलब्ध नाहीत. त्यामुळेच पंपावर देखील पेट्रोल डिझेलचा तुटवडा पडला आहे. आता वाहतूकदारांचा हा संप एक ते तीन जानेवारीदरम्यान सुरू राहणार आहे. त्यामुळे या काळात पंप देखील बंद राहतील, अशी अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. मात्र ही अफवा खोटी आहे.
संप का पुकारला?
केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणात एक नवीन कायदा आणला असून त्यानुसार, एखादया अपघातात व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंडाची शिक्षा होणार आहे. त्यामुळेच या नव्या कायद्याला विरोध करत सर्व चालक रस्त्यावर उतरले आहेत. सध्या या कायद्याला विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या भागात चालक आंदोलन करत आहेत.
व्हायरल पत्र
मात्र या दरम्यानच सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये पेट्रोल पंप तीन दिवस बंद राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु हा दावा खोटा आहे. असा कोणताही निर्णय पेट्रोल पंप चालकांनी घेतलेला नाही. पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने PDA) अधिकृतपणे कोणताही संप सुरू करण्याचा किंवा पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा दावा नाकारला आहे. त्यामुळे पेट्रोल पंप सुरूच राहतील. याबाबतची माहिती पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिली आहे.