हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने 2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व्याजदरात वाढ केली आहे. या चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफओने करोडो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आता इथून पुढे पगारी कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा 0.10 टक्के अधिक व्याजदर मिळणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यावर 8.25 टक्के व्याजदर मिळेल.
आज कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील सीबीटीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये व्याजदराच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. वाढीव व्याजदराला अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी दिल्यानंतरच संबंधित सूचना जारी करण्यात येतील. या सूचनांच्या आधारावर व्याजदराचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील.