फलटण | खाजगी सावकारी प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उमेश नरसिंग पवार (रा. सुरवडी, ता. फलटण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नांव आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज भीमराव वाघमारे (वय- 36, व्यवसाय नोकरी, रा. ७ सर्कल, साखरवाडी ता. फलटण) याने उमेश नरसिंग पवार याच्या विरोधात खाजगी सावकारी प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार उमेश पवार यांनी पंकज वाघमारे यांना पत्नीच्या औषधोपचारासाठी 80 हजार रुपये दिले होते. फिर्यादी यांनी आरोपीस आतापर्यंत 2 लाख 20 हजार रोख आणि गुगल प्ले वरून सुमारे 97 हजार 700 रुपये असे मिळून सुमारे 3 लाख 20 हजार रुपये दिले आहेत.
तरीसुद्धा उमेश पवार यांनी वाघमारे यांच्या बोलेरो गाडीचे आरसी पुस्तक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया फलटण शाखेचे खाते नंबर भरलेले धनादेश सह्या करून जबरदस्तीने घेतलेले आहेत. तसेच तो ते परत करत नाही. तसेच बोलेरोकार नावावर करून दे म्हणून फिर्यादी आणि त्याच्या पत्नीस राहते घरी जबरदस्तीने घुसून वारंवार अपशब्द बोलून शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे.