फलटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
फलटण शहरात सुरु असल्येल्या भुयारी गटार योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची अंत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. फलटण नगपरिषदेमध्ये सत्ताधारी पार्टीचा गलथान व अंदाधुंदी कारभार सुरु आहे. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून तातडीने फलटण शहरातील रस्ते दुरुस्त करावेत व नागरिकांना मूलभूत सेवा देण्यासाठी प्राध्यानेने प्रयत्न करावेत, असे निर्देश माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.
फलटण शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनवतीने जिंती नाका परिसरातून मोटारसायकलची संपूर्ण शहरभर रॅली काढून फलटण नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना याबाबतचे सविस्तर निवेदन दिले. त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेविका सौ. मंगलादेवी नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ. मदलसा कुंभार, नगरसेविका सौ. मीना नेवसे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, माजी नगरसेवक प्रविण आगवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सध्या फलटण शहरामध्ये कोरोना, डेंग्यू व चिकन गुनिया या रोगांची मोठ्या प्रमाणावर साथ आहे. शहरात सुरु असलेल्या मलनिस्सारण योजनेमुळे फलटण शहरातील रस्ते हे संपूर्ण खड्डेमय झालेले आहे. फलटण शहरामध्ये सध्या अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. असे सर्व प्रकार सुरु असताना फलटण नगरपरिषदेमधील सत्ताधारी यांच्याकडे कानाडोळा करीत आहेत. तरी फलटण शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा तातडीने देण्यात याव्यात. अन्यथा आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टी शांत बसणार असा इशारा सुद्धा या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला.