फलटण | सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात चोरीच्या मोटारी विकल्यानंतर आलेल्या पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून एकाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मृताची पत्नीही गंभीर जखमी झाली आहे.
राचुर्या एकनाथ काळे (वय 29) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून रोशनी राचुर्या काळे (23, दोघे सध्या रा. बरड, ता. फलटण) असे जखमी महिलेचे नाव आहे. संशयित पप्या ऊर्फ शुरवीर पवार व एका अनोळखी महिला, एक पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची फिर्याद सोमनाथ माणिक मोहिते यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवार, दि. 8 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास फलटण येथील सोमवार पेठ येथे सोमनाथ मोहिते घरी राचुर्या काळे व त्यांची पत्नी रोशनी काळे, संशयित पप्या हे तिघेजण आले होते. तेथे त्यांनी सोमनाथ यांच्याशी चर्चा केल्यानंतर तेथेच जेवण केले. त्यानंतर ते तिघेही तेथून बाहेर पडले. यानंतर घराबाहेर कुणाचे तरी भांडण सुरु असल्याने त्याचा आवाज आल्याने सोमनाथ मोहिते यांनी घराबाहेर जावून पाहिले असता जेवण करून गेलेल्या तिघा जणांमध्ये भांडण सुरु असल्याचे सोमनाथ यांनी पाहिले.
या वादातून चिडून जावून पप्या पवार याने धारधार सुर्याने रोशनी काळे हिच्या डोक्यावर वार करुन तिला जखमी केले. या हल्ल्यात पत्नी रोशनी जखमी झाल्याचे पाहून राचुर्या काळे हा पप्याच्या अंगावर धावून गेला. यावेळी पप्याने राचुर्यावर वार करुन त्याचा निर्घृण खून केला.
या घटनेनंतर याची माहिती तत्काळ फलटण पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती फिर्यादी सोमनाथ मोहिते यांनी पोलिसात दिली. घटनेची माहिती घेतल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, फलटण डीवायएसपी गणेश किंद्रे यांनी तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहेत.