हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचा फोन आला असल्याने दिल्लीत एकच खळबळ उडाली असून 100 या क्रमांकावर पंतप्रधान निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे तब्बल 7 कॉल आले. त्यानंतर सुरक्षा दलांची चांगलीच धावपळ उडाली. सुरक्षा दलाकडून या फोन कॉलचा कसून तपास करण्यात आला.
दि. 17 आणि 18 फेब्रुवारीच्या रात्री एका अज्ञात व्यक्तीने पोलीस कंट्रोल रुमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरात बॉम्ब ठेवला असल्याचा फोन केला. अज्ञाताच्या 7 कॉल्समुळे पोलीस विभागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. निवासस्थानात अनेक ठिकाणी हे बॉम्ब आपण स्वतः ठेवल्याचा दावा फोन करणारा करत होता. फोननंतर तातडीने पंतप्रधानांच्या घराला सुरक्षा यंत्रणेकडून घेरण्यात आले. निवासस्थानी कसून शोध घेण्यात आला. बॉम्ब विरोधी पथकाने एकेक कोपरा शोधून काढला पण बॉम्ब सापडला नाही. त्याचवेळी दिल्ली पोलिसांकडून संबंधित फोन करणाऱ्याचा शोध सुरु होता. अखेर या आरोपीचा मोबाईल नंबर सापडला. त्याला ट्रॅक करून पकडण्यात आले.
दिल्लीच्या दयालपूर भागातला हा रहिवासी असल्याचे उघड झाले असून रवीद्र तिवारी असे त्याचे नाव आहे. तिवारीचा मोठा भाऊ तीन वर्षे बेपत्ता असून त्याच्या पत्नीचे इतर कोणाशी संबंध असल्याचाही त्याला संशय आहे. या सर्वबाबतीत पोलीस काहीच करत नसल्याने त्याने खळबळ उडवून देण्यासाठी हा कॉल केल्याचे सांगितले जात आहे. याआधीही त्याने असे प्रकार केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, फोन करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कारवाई करण्याबाबत पावले पोलिसांकडून उचलण्यात आली आहेत.