कोल्हापूर | करवीर तालुक्यातील खेबवडे येथे नवरात्र उत्सवात मंडपात लायटिंग लावण्याच्या कारणातून तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. वैभव साताप्पा भोपळे (वय- 25, रा. लोहार गल्ली खेबवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुरज सातापा पाटील (वय- 25 रा. खेबवडे) असे हल्लेखोराचे नाव आहे. सुरज हा शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खेबवडे येथील मध्यवर्ती शिवाजी चौकात शिवशंभु तरुण मंडळाच्या वतीने यंदा नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री देवीची आरती झाल्यानंतर मंडळाचे सर्व कार्यकर्ते चौकात थांबले होते. यावेळी सुरज पाटील तेथे आला. यंदा नवरात्र उत्सवासाठी माझी लाइटिंग का घेतले नाही, असा सवाल त्याने केला. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत सुरजची वादावादी झाली.
कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीने नवरात्र महोत्सव होत असल्याने पुढील वर्षी पाहू, असे सांगून कार्यकर्त्यांनी सुरज याची समजूत काढली. तरीही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. नवरात्र उत्सव सोहळ्यासाठी पुढाकार घेणारा वैभव भोपळे याच्याशी संशयिताने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. संशयित आराेपी सुरज पाटील हा वैभव भोपळे याच्या अंगावर धावून गेला. धारदार चाकूने पोटावर आरपार वार केल्याने वैभव जमिनीवर कोसळला. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यास तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच वैभव भोपळे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रमोद जाधव, जिल्हा विशेष पथकाचे तानाजी सावंत, इस्पुरलीचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा मध्यरात्रीच खेबवडे येथे दाखल झाला.