पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पिंपरीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वर्ग मित्राने लग्नाचे आमिष दाखवून अडीच वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिल्यामुळे तरुणीने निगडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये आरोपी व्यक्तीचे नाव राजकुमार सिद्धपा नागराळी आहे. ही घटना ११ नोव्हेंबर २०१८ पासून १४ मे २०२१ च्या दरम्यान घडली आहे.
राजकुमार नागराळी हा तक्रार दाखल केलेल्या तरुणीचा वर्गमित्र आहे. राजकुमार नागराळी याने फिर्यादीला ११ नोव्हेंबर २०१८ रोजी वाढदिवसानिमित्त निगडीतील स्वॉन हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिकडे त्याने मित्र गणेश मोरे याचे ओळखपत्र दाखवून हॉटेलमध्ये रुम बुक केली व फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले. यानंतर फिर्यादी तरुणीने आपण लग्न झाल्यावर सर्व करु असे सांगितले. त्यावेळी आरोपीने त्या तरुणीची इच्छा नसतानाही त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
यानंतर राजकुमार सिद्धपा नागराळी याने फिर्यादीचा विश्वास संपादन करुन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फ्लॅट भाड्याने घेऊन ते नवरा बायकोसारखे राहून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर फिर्यादीने राजकुमार नागराळी याच्याकडे लग्नाबद्दल विचारणा केली असता आरोपीने त्यांना हाताने मारहाण केली. त्यामुळे याने आपली फसवणूक केल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.