औरंगाबाद – बेकायदा प्लॉटिंगचे प्रकार शहरात मनपा हद्दीत नेहमीच घडतात. मात्र आता तर चक्क स्मशानभूमीच्या राखीव जागेवरदेखील प्लॉटिंग केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. शहरातील शहानूरवाडी भागात स्मशानभूमीसाठी राखीव असलेल्या दोन एकर जागेवर अशाच पद्धतीने बेकायदा प्लॉटिंग करण्यात आली होती. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी ही प्लॉटिंग निष्कासित करून स्मशानभूमीची जागा मोकळी केली. या सर्व प्रकारामुळे मनपाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात महापालिकेने अतिक्रमण विभागातर्फे अवैध प्लॉटिंगविरोधात मोहीम सुरु केली आहे. शहरात बहुतांश परिसरात नो डेव्हलपमेंट झोनमध्ये अनधिकृत प्लॉटिंगचे पेव फुटले आहे. भूमाफियांकडून बेकायदा प्लॉचिंग करून त्याची सर्रास विक्री केली जाते. आता तर स्मशानभूमीच्या जागेपर्यंतही भूमाफियांची मजल गेल्याचे दिसून आले आहे. शहानूरवाडी येथील सर्व्हे नंबर 42 मधील गट क्रमांक 1 मध्ये स्मशानभूमीसाठी राखीव जागा आहे. त्यावर अनधिकृत प्लॉटिंग करून प्लॉट विक्रीची व्यवसाय सुरु होता. मनपाच्या अतिक्रमण विभागाला त्याची माहिती मिळाली, त्यानंतर सोमवारी येथे कारवाई करण्यात आली.
महापालिकेने शहानूरवाडी येथे स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित केलेी आहे. त्या जागेवर राजेंद्र वाणी, सुमित्रा वाणी, आशा पाचपुते आणि इतर काही जणांनी अनधिकृत प्लॉटिंग केली होती. त्याची विक्रीही सुरु झाल्याची माहिती मिळाल्यावर महापालिकेने येथए कारवाई केली. याप्रकरणी नियमानुसार पुढील कार्यवाही होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.