नवी दिल्ली । महागड्या डिझेलमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. विशेषत: ज्यांच्याकडे सिंचनाची उत्तम व्यवस्था नाही अशा शेतकऱ्यांना पिके घेण्यासाठी जास्त खर्च करावा लागतो. त्यांना एकतर पावसावर अवलंबून राहावे लागते किंवा डिझेल पंपाने सिंचन करावे लागते. त्यामुळे त्यांची किंमत वाढते आणि नफ्यावर परिणाम होतो.
असे शेतकरी आपला खर्च कमी ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात. याद्वारे तुम्ही केवळ फ्रीमध्ये सिंचनच करू शकणार नाही, तर सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सब्सिडीचाही लाभ घेता येईल. तसेच याद्वारे खर्च कमी झाल्याने कमाईही जास्त होईल.
पीएम कुसुम योजना
शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री कुसुम योजना. याचा लाभ घेऊन शेतकरी बांधव पिकांसाठी मोफत सिंचन करू शकतात. ही योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. या अंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप बसवण्यासाठी सब्सिडी दिली जाते. ही योजना ऊर्जा मंत्रालयाची आहे.
सौर पंपासाठी 75% सब्सिडी
योजनेंतर्गत 75% सब्सिडी दिले जाते. यामध्ये 30% सब्सिडी केंद्र सरकार तर 45% राज्य सरकार देते. सोलर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त 25% रक्कम भरावी लागते. हे पंप बसवण्यासाठी इन्शुरन्स कव्हर देखील उपलब्ध आहे. सौरऊर्जेवर चालत असल्याने सौर पंपाने सिंचनासाठी काहीही खर्च येत नाही.
जेथे सिंचनाची चांगली सोय नाही अशा शेतकऱ्यांसाठी सौरपंप हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सौरपंप बसवल्यास महागड्या डिझेलपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. यासोबतच ते त्यांचे उत्पन्नही वाढवू शकतात.