केंद्र सरकार मोठं पॅकेज जाहीर करणार? मोदी, शाह आणि सीतारामन यांच्यात बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनामुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच दुसरं प्रोत्साहनपर पॅकेज अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची याबाबत बैठकही झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी, गृह मंत्री अमित शाह आणि निर्मला सीतारामन यांच्यासोबतच्या या बैठकीला अनेक वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह आणि निर्मला सीतारमन यांच्याशी चर्चा केली असून अर्थखात्याशी संबंधित इतर महत्त्वाच्या खात्यांशीही चर्चा करणार आहे. लघु तसंच लघु आणि मध्यम उद्योगातील काही मोठ्या अधिकाऱ्यांसोबत नरेंद्र मोदी बैठक घेणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. अर्थ मंत्रालय देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांसमोर एक सविस्तर सादरीकरण करणार असून आपल्या वेगवेगळ्या योजनांचीही माहिती देणार आहे.

पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच नागरी उड्डाण, कामगार आणि ऊर्जा मंत्रालयासह विविध मंत्रालयांसोबत बैठक घेतली आहे. अर्थव्यवस्था लवकरात लवकर रुळावर आणण्यासाठी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांसह परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी वाणिज्य मंत्रालयासोबतही बैठक झाली आहे. या बैठकांमध्ये गृह मंत्री आणि अर्थमंत्र्यांचीही उपस्थिती होती.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या घटकांसाठी सरकारने यापूर्वी १.७० लाख कोटींची मदत जाहीर केली होती. यामध्ये मोफत अन्न वितरण, घरगुती गॅस वितरण, महिलांना अर्थसहाय्य यासह विविध उपाययोजनांचा समावेश होता. सूत्रांच्या मते, सरकार आता मध्यमवर्गीय आणि उद्योग जगतासाठी प्रोत्साहन पॅकेजवर विचार करत असल्याची माहिती आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment