हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात वंदे भारत ट्रेनला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. देशात अनेक राज्यात या ट्रेन धावत असून जनतेला चांगली सुविधा या वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून मिळत आहे. आत्तापर्यन्त देशभरात १६ वंदे भारत ट्रेन सुरु असून आज ओडिसा राज्यातील पुरी हावडा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन च्या देशाला १७ वी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनचे उद्घाटन पार पडले आहे.
उदघाटनानंतर मोदी म्हणाले, आज ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या लोकांना वंदे भारत ट्रेनची भेट मिळत आहे. वंदे भारत ट्रेन आधुनिक भारत आणि महत्वाकांक्षी भारतीय या दोघांचे प्रतीक बनत आहे. आज वंदे भारत ट्रेन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते तेव्हा यारूपाने भारताचा वेग आणि देशाची प्रगती दिसून येते.
दरम्यान, ओडिसाची ही पहिली आणि पश्चिम बंगालची दुसरी वंदे भारत ट्रेन आहे. यापूर्वी, बंगालला प्रथमच हावडा न्यू-जलपाईगुडी वंदे भारत एक्सप्रेसच्या रूपात वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेनची भेट मिळाली होती. पुरी-हावडा वंदे भारत ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावेल. डागडूगीच्याकारणास्तव गुरुवारी हि ट्रेन बंद राहणार आहे. ट्रेनच्या वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, हावडा ते पुरी (22895) हि वंदे भारत ट्रेन हावडा येथून सकाळी 6.10 वाजता सुटेल आणि पुरी येथे दुपारी 12.35 वाजता पोहोचेल. यानंतर (22896) पुरीहून दुपारी 1.50 मिनिटांनी निघेल आणि रात्री 20.30 मिनिटांनी हावडा येथे पोहचेल. 100 टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाने बनलेली ही ट्रेन पुरी ते हावडा दरम्यानचे 520 किलोमीटरचे अंतर अवघ्या 6 तासात पार करेल. या मार्गावर धावणाऱ्या ट्रेनचा कमाल वेग ताशी 130 किमी असेल. ही ट्रेन पुरीमार्गे खुर्द रोड, भुवनेश्वर, कटक, जाजपूर, भद्रक, बालासोर, खरगपूर मार्गे हावडा गाठेल.