यंदाही ‘हर घर तिरंगा’ मोहिम; पंतप्रधान मोदींचे Tweet करत देशवासीयांना आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा स्वातंत्र्य दिवस (Independence Day 2023 ) येत्या 3 दिवसांवर आला आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य उत्सवाची तयारी जल्लोषात सुरू करण्यात आली आहे. सर्व पातळीवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे तसेच मोहिमा राबविण्याचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi यांनी देखील ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना या मोहिमेत सहभागी होण्याची विनंती केली आहे.  नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ट्विट केले असून त्यामध्ये याबाबतची माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “देशाचा तिरंगा हा स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. प्रत्येक भारतीयाचं आपल्या ध्वजाशी भावनिक नातं आहे. तिरंगा आपल्याला राष्ट्रीय प्रगतीसाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतो. मी तुम्हांला सर्वांना विनंती करतो की १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हा. तिरंग्यासह तुमचे फोटो अपलोड करा.” या ट्वीटसोबत त्यांनी https://harghartiranga.com ही लिंक दिलेली आहे.

नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या या लिंकमध्ये आपण तिरंग्या सोबतचा फोटो अपलोड करू शकतो. गेल्या वर्षी देखील नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहिमेचे आव्हान केले होते. या मोहिमेत अनेकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. त्यानंतर आता या वर्षी देखील या मोहिमेसाठी आवाहन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी तब्बल ६ कोटी १४ लाख देशवासीयांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. मोहिमेच्या सुरू होण्यापूर्वीच या सर्व लोकांनी लिंक वर आपले फोटो अपलोड केले होते. त्यामुळे आता यावर्षी या मोहिमेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, सध्या संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अनेकांनी स्थानिक पातळीवर स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी केली आहे. यामध्ये, परिसर स्वच्छ ठेवणे, तिरंग्याचे महत्त्व समजून सांगणे, रस्त्यांवर टाकण्यात आलेले झेंडे यांची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावणे अशा छोट्या छोट्या मोहिमांचा देखील समावेश आहे. बहुतांश अशा मोहिमांमध्ये स्थानिक पातळीवरील नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.