देशात 5G सेवा लॉन्च; ‘या’ शहरांमध्ये मिळणार सुपरफास्ट इंटरनेट

modi 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर भारतात 5G सेवा सुरू झाली आहे. दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये मोदींनी 5G सेवेचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होत्या. देशातील अनेक शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होणार आहे.

आज देशाच्या वतीने, देशाच्या दूरसंचार उद्योगाच्या वतीने, 130 कोटी भारतीयांना 5G च्या रूपाने एक अद्भुत भेट मिळत आहे. 5G ही देशात नव्या युगाचे दार ठोठावत आहे. 5G ही संधींच्या अनंत आकाशाची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयाचे अभिनंदन करतो. असं मोदींनी म्हंटल . नवा भारत हा केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक म्हणून राहणार नाही, तर त्या तंत्रज्ञानाच्या विकासात आणि अंमलबजावणीत भारत सक्रिय भूमिका बजावेल. भविष्यातील वायरलेस तंत्रज्ञानाची रचना करताना, त्याच्याशी संबंधित उत्पादनात भारताची मोठी भूमिका असेल असेही ते म्हणाले.

2G, 3G, 4G च्या काळात भारत तंत्रज्ञानासाठी इतर देशांवर अवलंबून होता, पण 5G ने भारताने नवा इतिहास रचला आहे. 5G सह, भारत प्रथमच दूरसंचार तंत्रज्ञानामध्ये जागतिक स्टॅंडर्ड स्थापित करत आहे. डिजिटल इंडियाबद्दल बोलताना काही लोकांना वाटते की ही फक्त सरकारी योजना आहे. पण डिजिटल इंडिया हे केवळ नाव नाही, तर देशाच्या विकासाचे मोठे व्हिजन आहे. लोकांसाठी काम करणारे, लोकांशी जोडून काम करणारे ते तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे या व्हिजनचे ध्येय आहे असेही मोदींनी म्हंटल.

दरम्यान, दूरसंचार विभागाने म्हटले आहे की 5G सेवेचा लाभ सर्वप्रथम देशातील 13 शहरांमध्ये राहणाऱ्या यूजर्सना मिळेल. यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, चंदीगड, बेंगळुरू, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, पुणे, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या शहरांचा समावेश आहे. या शहरांनंतर, वर्षाच्या अखेरीस, इतर मोठ्या शहरांमध्ये 5G सेवेशी जोडलेले नेटवर्क तयार केले जाईल आणि यूजर्सना त्याचा लाभ मिळेल. मात्र, सध्या केवळ 8 शहरांनाच त्याचा लाभ मिळत आहे.