हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी विठ्ठलाला आणि वारकऱ्यांना नमन करतो. देशावर कितीही संकटं आली तरी भगवान विठ्ठलाची दिंडी अखंडपणे कायम सुरू राहिली. पंढरपूरची वारी ही जगातील सर्वात प्राचीन जनयात्रा म्हणून ओळखली जाते पंढरीकडे जाणारे हे रस्ते भागवत धर्माची पताका नेणारे ठरतील,” असा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.ते पंढरपूर पालखी मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते.
मोदींनी राम कृष्णहरी… राम कृष्णहरी म्हणत कार्यक्रमाची सुरुवात केली. शंकराचार्याने सांगितलं आहे पंढरपूरला आनंदाचंही प्रत्यक्ष स्वरुप आहे. आज त्यात सेवेचा आनंदही मिसळला आहे. मला आनंद होत आहे संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचा शुभारंभ होत आहे. वारकऱ्यांना सुविधा मिळणार आहे. पंढरपुराकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल, असं मोदी म्हणाले.
सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना भगवान विठ्ठलापासून मिळणाऱ्या प्रेरणेतून निर्माण झाली आहे. माझं पंढरपूरशी विशेष नातं आहे. भगवान द्वारकाधीश इथे येऊन विठ्ठल रुपात विराजमान झाले. दुसरं नातं म्हणजे माझं काशीशी नातं आहे आणि पंढरपूर हे आमच्यासाठी दक्षिण काशी आहे,” असं मोदी म्हणाले. “या भूमीने संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि संत तुकारामांसारखे संत आणि नवीन ऊर्जा दिली. विठूमाऊलीच्या दर्शनाने डोळ्यांचे पारणे फिटते असे मोदी म्हणाले.