हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक वॉर सुरू आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहे. त्यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राजीव गांधी यांचे नाव घेत काँग्रेसवर सर्वात मोठा हल्ला केला आहे. राजीव गांधींनी (Rajeev Gandhi) आपली मालमत्ता वाचवण्यासाठी वारसा कायदा रद्द केला होता, जेणेकरून मालमत्ता सरकारकडे जाऊ नये असा थेट आरोप मोदींनी केला आहे. मध्य प्रदेशातील मुरैना येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
आपल्या भाषणात मोदी म्हणाले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निधन झाले तेव्हा त्यांची मालमत्ता त्यांच्या मुलांना मिळणार होती. परंतु त्यापूर्वी असा नियम होता की मालमत्ता मुलांकडे जाण्यापूर्वी त्यातील काही हिस्सा सरकार घेते… मात्र आपली मालमत्ता सरकारकडे जाऊ नये म्हणून ती वाचवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वारसा हक्क कायदाच रद्द केला. आज सत्ता मिळवण्याच्या लालसेपोटी या लोकांना तोच कायदा अधिक कठोरपणे परत आणायचा आहे असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला.
मोदी पुढे म्हणाले, काँग्रेस (Congress) सत्तेत आल्यास लोकांच्या पूर्वजांनी सोडलेली निम्म्याहून अधिक मालमत्ता वारसा कराच्या माध्यमातून काढून घेईल. काँग्रेस म्हणते की देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे, तर मी म्हणतोय की देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क गरिबांचा आहे. देशवासियांनो तुम्ही चिंता करू नका, तुमच्यामध्ये आणि काँग्रेसच्या लुटीमध्ये हा नरेंद्र मोदी एखाद्या भिंतीसारखा उभा आहे.