‘अम्फानग्रस्त’ पश्चिम बंगालसाठी मोदींनी जाहीर केलं १ हजार कोटींचं पॅकेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी अम्फान महाचक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या पश्चिम बंगाल आणि ओडिशा दौऱ्यासाठी दिल्लीहून कोलकाताला दाखल झाले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची  हॅलिकॉप्टरमध्ये बसून  हवाई पाहणी केली. या पाहणीनंतर पंतप्रधान मोदींनी ‘अम्फान’मुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालसाठी १ हजार कोटींचं आर्थिक मदत पॅकेज जाहीर केलं आहे. याशिवाय मृतांच्या कुटुंबीयांनाही आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधानांनी केली. मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये मदत म्हणून देण्यात येणार आहे.

देशात कोरोना व्हायरसचं संकट आहे. याच वेळेत पूर्व भागाला अम्फान वादळाचा तडाखा बसला. राज्य आणि केंद्र सरकारनं मिळून या महाचक्रीवादळाला तोंड देण्याची तयारी केली होती. परंतु, त्यानंतरही ८० जणांचा जीव आम्ही वाचवू शकलो नाही. या चक्रीवादळात संपत्तीचंही मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये घर आणि पायाभूत सुविधांचंही नुकसान झालं असल्याचं पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यावेळी म्हटलं.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान पाहणीचं आव्हान पंतप्रधान मोदींना दिलं होतं. त्यानंतर पंतप्रधान आज कोलकाता येथे दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जयदीप धनकड कोलकाता विमानतळावर उपस्थित झाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment