ममता दीदी, राग काढायचा तर माझ्यावर काढा : पंतप्रधान मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 17 एप्रिलला होणार आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचारमोहीम राबवली आहे. वर्धमान इथं आयोजित प्रचार रॅलीत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं. ममता बॅनर्जी केंद्रीय यंत्रणांविरोधात कार्यकर्त्यांना भडकावण्याचं काम करत आहेत. दीदी तुम्हाला राग काढायचा तो माझ्यावर काढा, मला शिव्या घाला, अशा शब्दात मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

पहिल्या चार टप्प्यात तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे, असा दावा पंतप्रधान मोदींनी वर्धमान येथे केला. त्याचबरोबर मतता बॅनर्जी यांचा एकदा पराभव झाला की, त्या परत कधीच निवडून येणार नाहीत. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा एकदा पराभव झाल्यानंतर ते परत आले नाहीत. वामपंथी, डाव्यांचा पराभव झाल्यानंतर तेही पुन्हा निवडून आले नाहीत. त्यामुळे दीदी, तुम्ही एकदा गेलात की परत येणार नाहीत, असा टोलाही पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जींना लगावला आहे.

 

त्याचबरोबर ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केलाय. दीदी आणि त्यांचे कार्यकर्ते बंगालमधील अनुसूचित जातीतील आमच्या बांधवांना शिव्या घालत आहेत. त्यांना भिकारी संबोधत आहेत. 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. बाबासाहेबांच्या जयंतीपूर्वीच दीदी आणि त्यांच्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप मोदींनी केला.

गेल्या चार टप्प्यात झालेल्या मतदानानंतर 92 जागा जिंकण्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलाय. आतापर्यंत 4 टप्प्यात झालेल्या मतदानानंतर भाजप 92 पेक्षा जास्त जागा जिंकेल. दीदी आपल्या भाषणात बंगालपेक्षा माझंच नाव अधिक घेतात. त्या जेवढ्या शिव्या मला देतात त्याचा हिशेब नाही, असा टोला अमित शाह यांनी लगावला.

You might also like