PM Vishwakarma Yojana | स्वातंत्र्यदिनानिमित्त करण्यात आलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती. या योजनेला लगेच 24 तासांच्या आत केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेची विश्वकर्मा जयंती दिनी अंमलबजावणी करण्यात येईल. केंद्र सरकारकडून या योजनेसाठी तब्बल 13 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या कामगारांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. तर केंद्र सरकार कामगारांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी देखील मदत करेल.
3 लाख पर्यंत कर्ज 5% सवलतीच्या दराने –
विश्वकर्मा योजनेअंतर्गत (PM Vishwakarma Yojana) कामगारांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज ५% सवलतीच्या दराने देण्यात येईल. योजनेअंतर्गत विणकर, सोनार, लोहार, कपडे धुण्याचे कामगार अशा सर्व कामगारांचा समावेश असेल ज्यांना सरकार मदत करेल. या योजनेचा लाभ अशा ३० लाख कुटुंबियांना होणार आहे. सुरुवातीला या योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२३-२४ ते आर्थिक वर्ष २०२७-२८ या पाच वर्षांच्या कालावधीत १३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील. पुढे या योजनेचा विकास पाहून ही रक्कम देखील वाढवली जाईल.
कोणाकोणाला मिळणार लाभ – (PM Vishwakarma Yojana)
पंतप्रधानांनी दिलेल्या माहितीनुसार, ही योजना 17 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत, लोहार, कुंभार, गवंडी, धोबी, फुलविक्रेते, मासे जाळे विणणारे, कुलूप, असा पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या सर्व कामगारांना मदत करण्यात येईल. तसेच, योजनेअंतर्गत पारंपारिक व्यवसायांना आणि विकास कौशल्यांवर जास्त प्रमाणात भर दिला जाईल. महत्वाचे म्हणजे, या योजनेअंतर्गत उपकरण खरेदी करण्यासाठी देखील सरकार कामगारांना मदत करेल.
त्याचबरोबर, विश्वकर्मा योजनेअंतर्गत दोन प्रकारचे कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येतील, ज्या मधील पहिला टप्पा बेसिक आणि दुसरा टप्पा प्रगत आधारित असेल. हा अभ्यासक्रम शिकणाऱ्यांना सरकारकडून मानधन देखील देण्यात येईल. तर कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्याला प्रतिदिन पाचशे रुपये मानधन देण्यात येईल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येईल. ज्यावर सवलतीचे व्याजदर असेल.
उपकरणे खरेदीसाठी 15 हजारांची आर्थिक मदत –
इतकेच नव्हे तर , कामगाराने आपला व्यवसाय उभा केल्यानंतर सरकारकडून त्यांना दोन लाखाचे कर्ज देण्यात येईल. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत कारागिरांना आणि कामगारांना विश्वकर्मा योजनेचे प्रमाणपत्र देऊन त्यांना नवीन ओळख दिली जाईल. तसेच कामगारांना डिजिटल व्यवहारांमध्ये प्रोत्साहन आणि जागतिक पातळीवर व्यवसाय वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून हव्या त्या गोष्टी पुरविण्यात येतील. एखाद्या कामगाराला जर आधुनिक उपकरणे खरेदी करायचे असेल तर त्याला देखील पंधरा हजारापर्यंतची मदत सरकारकडून केली जाईल. अशा अनेक गोष्टींचा लाभ विश्वकर्मा योजना अंतर्गत कामगारांना मिळणार आहे.