हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारताबरोबर इतर देशांमध्ये देखील महिलांसाठी प्रसूती रजेची (Maternity Leave) तरतूद करण्यात आली आहे. परंतु आपल्या सहकर्मचारीने ही प्रसूती रजा घेऊ नये यासाठी एका दुसऱ्या कर्मचारी महिलेने तीला विष पाजण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्व घटनेमुळे चीनमध्ये सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. आता या कर्मचारी महिलेवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील एका संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी महिलेवर आरोप लावण्यात आला आहे की, तिने गर्भवती महिलेला “प्रसूती रजा” घेण्यापासून थांबवण्यासाठी तिला विष पाजण्याचा प्रयत्न केला. ही घटना त्यावेळी उघडकीस आली जेव्हा एका व्हिडिओमध्ये संबंधित आरोपी महिला गर्भवती महिलेच्या पेयामध्ये संशयास्पद पदार्थ टाकताना पकडली गेली. हे सर्व दृश्य पाहून गर्भवती महिलेला देखील धक्का बसला. यासोबत सोशल मीडियावर देखील या प्रकरणामुळे खळबळ उडाली.
मुख्य म्हणजे, सुरुवातीला गर्भवती महिलेला आपल्या पाण्याच्या चवीमध्ये बदल झाल्याचे लक्षात आले होते. यामुळे तिने संस्थेमध्ये मिळणारे पाणी पिणे बंद केले. परंतु तरीदेखील तिला पाण्याच्या चवीमध्ये फरक पडलेला दिसून आला नाही. यामुळे तिला संशय आला की, आपण पीत असलेल्या पाण्याशी कोणीतरी छेडछाड करत आहे. पुढे याच गोष्टीचा छडा लावण्यासाठी गर्भवती महिलेने आयपॅडचा वापर दररोज घडणाऱ्या गोष्टींचा व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओच्या माध्यमातूनच तिच्यासमोर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, या सर्व घटनेनंतर गर्भवती कर्मचारी महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलीस घडलेल्या प्रकाराचा तपास करीत आहेत. सांगितले जात आहे की, गर्भवती कर्मचारी महिलेने प्रसूती रजा घेऊ नये यासाठी तिच्याच सोबत काम करणाऱ्या दुसऱ्या महिलेने तिला विष पाजण्याचा प्रयत्न केला. कारण, गर्भवती कर्मचारी महिलेने रजा घेतली असती तर कामाचा अधिक भार या दुसऱ्या कर्मचारी महिलेवर पडला असता.