औरंगाबाद | औरंगाबाद पोलिसांनी मोठी कामगिरी करत अवैधरित्या बायोडिझेलचा साठा करून विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल ३३ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सर्व आरोपींविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिनानगर येथील रोडवर काही इसम विना परवाना बायोडिझेलचा साठा करून वाहनांमध्ये अवैधरित्या भरुन त्याची चोरटी विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना सुत्रांकडून मिळाली. मग मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास हिनानगर रोडलगत असलेल्या के.के. ट्रेडर्स येथे छापा टाकला असता त्याठिकाणी एक टोळी अवैधरित्या बायोडिझेलचा साठा करून विक्री करत असल्याचे निर्दशनास आले. याठिकाणी आरोपी इरफान खान खमर खान (३५), जाहेद हमीद शेख (२९), जयराम चव्हाण (४५), शेख तखीयोद्दीन शेख अहेमद (३४), मोहसीन खान मोहम्मद खान (३०), शाकेर खान इफ्तेखार खान (२६), बाळासाहेब आहेर (३९) यांना ताब्यात घेतले आहे.
या आरोपींकडून घटनास्थळावर २ हजार ५९७ लिटर व टॅंकरमध्ये ९ हजार ९४० किलो असे एकूण ८ लाख ७७ हजार ५५० रुपये किमतीचे बायोडिझेल, ३ लाख २७ हजार ६० रोख रक्कम, २१ लाख ४ हजार ७०० रुपये किंमतीचे वाहन आणि मोबाईल असे एकूण ३३ लाख ९ हजार ३१० रूपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला असून, आरोपींवर कलम ३ व ७ जिवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ प्रमाणे एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.