सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे
वाळवा तालुक्यातील चिकुर्डे जवळ असणाऱ्या माळवाडी परिसरातील घरात कोणी नसल्याचे पाहून सख्ख्या भावानेच घराचा दरवाजा व कडी कोयंडा लोखंडी टॉमीने उचकटून घरातील 1 लाख 88 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी जावेद बादशाह तांबोळी याला कुरळप पोलिसांनी अटक केली आहे. चिकुर्डे येथील सलीम तांबोळी हे कुटुंबियांसमवेत परगावी गेले होते.
या संधीचा फायदा घेवून त्याचा भाऊ जावेद तांबोळी याने घराचा दरवाजा व कडी कोयंडा लोखंडी टॉमीने मोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटुन तसेच पत्र्याची पेटीची कडी उचकटुन त्यातील साडेतीन तोळयाचे मंगळसुत्र, दीड तोळयाचा एक सोन्याचा नेकलेस, अर्धा तोळा एक जोड सोन्याचे कानातील टॉप्स, अर्धा तोळा एक सोन्याची वेडणची अंगठी, एक तोळा सोन्याची वेडणची अंगठी, अर्धा तोळयाचे तीन जोड सोन्याचे कानातील टॉप्स असा एकूण 1 लाख 88 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
पोलिसांनी गतीने तपासाची सुत्रे हलवली. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न करून संशयित आरोपी जावेद तांबोळी याच्याकडे विचारपूस केली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हयाची कबूली देत चोरीस गेलेला मुद्देमाल काढून दिला.