सातारा | वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील अल्पवयीन मुलीचे दीड महिन्यापूर्वी लग्न लावून सासरी जाण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या मामा, मामी, आजी व नवरा यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठार स्टेशन येथील अल्पवयीन मुलीची मामी रंजना संतोष कांबळे, आजी इंदूबाई कांबळे यांनी दीड महिन्यापूर्वी संबंधित मुलीचा विवाह बोरीखेड (ता. खंडाळा) येथील ऋषिकांत शेखर डोईफोडे यांच्याशी लावला होता.
दरम्यानच्या काळात मुलगी सासरी नांदण्यासाठी जात नसल्याने मामा संतोष कांबळे, मामी रंजना, आजी इंदूबाई व नवरा मुलगा ऋषिकांत हे मुलीला जबरदस्ती करत होते. यांच्या त्रासाला कंटाळून मुलीने वाठार पोलिस ठाण्यात या चौघांविरुद्ध फिर्याद दिली असून, या चौघांवर वाठार पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस गुरव करीत आहेत.