औरंगाबाद – शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढतच आहेत अशातच इलेक्ट्रिक मोटर च्या सहाय्याने घरगुती गॅस व्यवसायिक सिलेंडर मध्ये भरून विकणाऱ्या दर्गा रोड तसेच वळदगाव शिवारातील काही जणांविरुद्ध गुन्हे शाखा तसेच पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने कारवाई केली. या वेळी पाच लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल संबंधित पथकाने जप्त केला आहे.
शहरातील शहानुर मिया दर्गा रोड परिसरात नाल्याच्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस चा वापर इलेक्ट्रॉनिक मोटर च्या सहाय्याने व्यवसायिक सिलेंडर मध्ये होत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्ता शेळके यांच्या पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या परवानगीने पुरवठा निरीक्षकांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी छापा मारला. या छाप्यात तब्बल 103 सिलेंडर सापडले असून, यात विविध कंपन्यांच्या सिलेंडरच्या समावेश होता. या कारवाईत 3 लाख 63 हजार 950 रुपयांच्या मुद्देमालासह शेख मुख्तार शेख उस्मान (रा. पीरबाजार) याच्यासह एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
दुसऱ्या कारवाईत पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले यांच्या पथकाने वळदगावातील गॅस रिफिलिंग च्या अड्ड्यावर छापा मारला. या ठिकाणी बिलाल शेख, गजानन मच्छिंद्र गायकवाड, शेख अश्पाक शेख सादीक, शालिकराम कानडजे हे चौघे घरगुती गॅस सिलेंडर मधून मोटारीच्या आधारे रिक्षामध्ये गॅस भरत होते. या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रिक्षा व अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.