औरंगाबाद प्रतिनिधी । २ जानेवारी १९६१ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांना ध्वज अर्पण केले असल्याने २ जानेवारी हा पोलीस स्थपना दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने पोलीस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आज या सप्ताहाचे उद्घाटन पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.
पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस मुख्यालय येथील देवगिरी क्रिडा संकुल औरंगाबाद शहर येथे २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सायबर पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखा, महिला तक्रार निवारण केंद्र, वाहतुक शाखा, बीडीडीएस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असे विविध पोलीस विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. जेणेकरुन औरंगाबाद शहरातील विद्यार्थी तसेच नागारिकांना पोलीसांच्या कामकाजाबाबत आणि विविध शाखांबाबत माहिती करुन घेता येईल.
दरम्यान या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस आयुक्त चिरंजिव प्रसाद यांचे हस्ते आज सकाळी १०.३० वाजता करण्यात आले. या कार्यक्रमास पोलीस उपआयुक्त मिना मकवाना,पोलीस उप-आयुक्त परीमंडळ- निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-II राहुल खाटमोडे, सहायक पोलीसआयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्यासह कर्मचारी आणि औरंगाबाद शहरातील शालेय विद्यार्थी उपस्थित होते.