सातारा | सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाईत मदत करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी पोलिस पाटलाला अटक करण्यात आली. दरम्यान, पोलिस पाटलाने पैसे घेतल्याचे समोर आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत तुकाराम बर्गे (वय- 47, रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी. या प्रकरणातील तक्रारदार यांच्यावर तालुका पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे. संबंधित गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस पाटील चंद्रकांत बर्गे याने तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. किरकोळ कारवाईसाठी लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागात (एसीबी) तक्रार केली.
पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी तक्रार घेऊन पथकाला तपासाच्या सूचना केल्या. दि. 27 रोजी एसीबी विभागाने पडताळणी केली असता 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी होत असल्याचे समोर आले. तडजोडीअंती ती लाच 15 हजार रुपयांची घेण्याचे ठरले. लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीने पोलिस पाटलाला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलिस पाटील व पोलिस कर्मचाऱ्यांच्यात खळबळ उडाली आहे.