सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
आपल्या घरात आईचे दागिने लुटणाऱ्या मुलाला अवघ्या सहा तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्याची घटना वाई तालुक्यातील सटालेवाडी येथे घडली आहे. बंद घरातून तब्बल 1 लाख 75 हजाराचा मुद्देमाल व सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून आरोपीला अटक करीन त्याच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सटालेवाडी ता. वाई जि. सातारा गावातील विद्या दिपक जाधव (रा. सटालेवाडी ता. वाई) या सासू बाबर हॉस्पीटल वाई येथे उपचाराकरीता अॅडमीट असल्याने बाहेर गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या घरात अज्ञात चोरटयाने प्रवेश करुन त्यांच्या कपाटातील 1 लाख 75 हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे त्यामध्ये नेकलेस कर्णफुले व वेडणे चोरून नेले. याबाबतची त्यांनी तक्रार वाई पोलिस ठाण्यात दिली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर उप विभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग श्रीमती शितल जानवे खराडे यांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना अज्ञात आरोपीचा शोध घेवून पकडण्याबाबत आदेश दिले होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी हे घटना घडल्यानंतर वाई शहरात पेट्रोलिंग करुन आरोपींचा शोध घेत होते.
यावेळी त्यांना सदरची चोरी फिर्यादीच्या घरातीलच व्यक्तिने केलेली असल्याची गोपनीय स्वरूपात माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचाऱ्यांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सटालेवाडी वाई शहरात संशयीत आरोपीचा शोध घेतला. यावेळी एस. टी. स्टॅण्ड वाई समोर एक संशयीत फिरत असताना दिसला. यावेळी संशयित आरोपी पळून जात असताना त्यास पाठलाग करुन पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे खिशात सदर गुन्हयात चोरीस गेलेले 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे मिळून आले.
विशेष म्हणजे आरोपी हा फिर्यादी यांचा मुलगा असून त्याचे विरुध्द यापुर्वीही चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शितल जानवे-खराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी विजय शिर्के, सोनाली माने, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, अमित गोळे यांनी सदरची कारवाई केलेली आहे.