शिवीगाळ करून सफाई कर्मचाऱ्याला मारहाण; चौघांना अटक

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे एका खासगी कंपनीतील सफाई कर्मचाऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करीत चौघांकडून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील एका खासगी कंपनीत काम करत असलेल्या प्रकाश भानुदास तिबोटे (वय 42, रा.केंजळ, ता. भोर, जि.पुणे) यांना आर्यन जाधव, अनिकेत कांबळे, संजय कोळी, रामा मंडलिक (चौघे रा. शिरवळ ता.खंडाळा) यांनी शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील असलेले 2 हजार रुपये रोख घेतले. शिवाय दारू व गांजा पिण्यासाठी पैशाची मागणी करीत मोटारसायकल (क्र. एमएच 11 सिक्यू 8365 ) व दुचाकी अन्य वाहनांची दगडाने तोडफोड केली.

यावेळी संबंधित आरोपींनी खेर्रब महादेव देवकर यांच्या मालकीची कार (क्र.एमएच 11 सिक्यू 8365), नवनाथ शंकर शिंदे यांची कार (क्रं. एमएच 11 वाय 4052) चेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. याप्रकरणी संबधितांविरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात प्रकाश तिबोटे यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच संबंधितांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयाने आरोपीना सोमवार, दि. 14 फेब्रुवारी पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार करीत आहेत.