कराड | प्रीतिसंगम बागेच्या तार कंपाउंडवर तसेच कृष्णा नाका ते विजय दिवस चौकादरम्यान रस्त्याच्या बाजूला विविध ठिकाणी विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावणाऱ्या दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यानुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सचिन प्रकाश राऊत (रा. बनवडी, ता. कराड) व शिवानी देसाई (रा. मलकापूर, ता. कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कराड नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक मिलिंद शिवाजीराव शिंदे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कराड शहरातील कृष्णा नाका ते विजय दिवस चौक तसेच कृष्णा घाटावरील प्रीतिसंगम बागेच्या तार कंपाउंडवर शुभकार्यम मराठा विवाह संस्था, विद्यानगर, बनवडी रोड, कराड यांनी मराठा समाज वधू-वर मेळाव्याच्या आमंत्रणाचे 22 फ्लेक्स बोर्ड लावलेले आढळून आले. याप्रकरणी वधू वर सूचक केंद्राचे सचिन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर शिवानी देसाई यांनी शिव हेअर अँड मेकअप आर्टिस्ट या नावाच्या दुकानाच्या जाहिरातीचा विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावला आहे. महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रूपणास प्रतिबंध करण्याबाबतच्या कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांनी तक्रार दिली. त्यावरून संबंधित दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.