सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
वैदेही मल्टीस्टेट ऍग्रो को-ऑपरेटिव्ह सोसायटी, साखरवाडी, ता. फलटण येथील कंपनीत 1 कोटी 8 लाख रुपयांच्या अपहार करून 2 आरोपी फरार झाले होते. संबंधित आरोपींचा शोध घेत सातारा आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी 8 महिन्यानंतर त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैदेही मल्टीस्टेट ऍग्रो को-ऑपरेटिव्ह सोसायटी, साखरवाडी, ता. फलटण येथील कंपनीत चेअरमन, संचालक व इतर यांनी सामान्य जनतेला आर्थिक लाभाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना कंपनीच्या विविध प्लॅनमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून सामान्य जनतेची आर्थिक फसवणूक केल्याबाबत 29 जून 2022 रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा अधिक तपास सातारा आर्थिक गुन्हे शाखा करत होते. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आज अखेर 1 कोटी 8 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या गुन्ह्यातील आरोपी सोमनाथ खंडू नेहे (रा. पाथर्डी फाटा, नाशिक) आणि ज्ञानेश्वर तुकाराम गाढवे (रा. बोपर्डी, ता. वाई) याचा गेल्या 8 महिन्यांपासून पोलीस शोध घेत असताना ते सापडत नव्हता. दरम्यान ज्ञानेश्वर गाढवे यास दि. 6 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, सोमनाथ नेहे हा सापडत नव्हता. त्याला अटक करण्यासाठी पथकही तैनात करण्यात आले होते.
सोमनाथ नेहे हा 17 फेब्रुवारी रोजी पुणे येथे येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक जाधव यांना मिळाली. त्यानंतर केलेल्या तांत्रिक विश्लेषनाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी सापळा लावून सोमनाथ नेहे यास जेरबंद केले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. त्याच्यावर एकूण 37 गुन्हे नाशिक येथे दाखल आहेत.
संबंधित अटकेची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक मोहन शिंदे यांच्यासूचनेनुसार तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे, पोलीस हवालदार प्रशांत ताटे, पोलीस नाईक मनोज जाधव, संजय मोरे, चालक संतोष राऊत यांनी सहभाग घेतला.