अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
महसूल उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या दारू विक्रीचे परिणाम पहिल्याच दिवशी उघडकीस आले असून चक्क पोलीस पाटलानेच दारूच्या नशेत विलगीकरण कक्षात असलेल्या महिलेला शरीर सुखाची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वडगाव राजदी येथे घडला आहे. तर दुसरीकडे पोलीस पाटलाच्या अश्या वागणुकीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, वडगाव राजदी येथील एक महिला हाताला काम नसल्यामुळे आपल्या पती सोबत मुबंई येथे मोलमजुरीला गेली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अखेर त्या दोघांनी सुद्धा आपले मूळ गाव वडगाव राजदी गाठले. कोरोना विषाणूच्या कारणावरून गावकऱ्यांच्या विनंतीनुसार ती आपल्या पतीसोबत जिल्हापरिषद शाळेच्या विलगीकरण कक्षात मागील चार दिवसांपासून दिनांक ६ मे पासून रहात आहे. वडगाव बाजदी येथील पोलीस पाटील रणजित गजबे यांच्याकडे वडगाव राजदी या गावचा कार्यभार असल्याने त्यांनी व्यवस्था केली. मात्र शुक्रवारी रात्री ८ वा. च्या दरम्यान पोलीस पाटील रणजित गजबे हा संबंधित महिलेजवळ आला व अश्लील भाषेत वर्तन करून हात पकडून माझ्यासोबत चल असे म्हणूज शरीर सुखाची मागणी केली व मागणी पूर्ण न केल्यास उपाशी ठेवण्याची धमकी दिली.
इतर उपस्थितांच्या समोर घडलेल्या या घटनेत महिलेने आरडाओरड करताच पोलीस पाटील घटनास्थळावरून पळून गेला. आज सकाळी ग्रामपंचायत कर्मचारी व आशा सेविका आल्यानंतर पीडित महिलेने घडलेला प्रकार त्यांच्याकडे कथन केला. गावकऱ्यांनी लगेच चांदुर पोलिसांना पाचारण केले. दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक शंकर ढोले व पो.का.पंकज शेंडे,विनोद वासेकर यांनी आरोपी पोलीस पाटलाला ताब्यात घेतले. तर पोलीस पाटील च्या विरोधात भादवी 354(अ),394 अनव्य गुन्हा दाखल केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.