राजकीय तर्कवितर्क : भाजपचे खा. छ. उदयनराजे यांची शिवसेनेच्या दिग्गज नेत्यासोबत बंद खोलीत चर्चा

सातारा | भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज बुधवारी सकाळी महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या तापोळा विभागातील दरे गावी जाऊन भेट घेतली. या दोन बड्या नेत्यांच्या भेटीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे. तसेच यावेळी बंद खोलीत दोनच नेत्यात अर्धा तास चर्चा झाली असून चर्चेबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही.

शिवसेनेचे वजनदार नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे या गावी आपल्या कुटुंबासह आलेले आहेत. दरे याठिकाणी छ. उदयनराजे भोसले यांनी बुधवारी सकाळी जाऊन भेट घेतली. जावळी तालुक्यातील कोळघर-सोळशी गावातून खासदार उदयनराजे भोसले तराफ्यामधून एकनाथ शिंदे यांच्या दरी गावी पोहचले. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

यावेळी या बड्या नेत्याच्यांत बंद खोलीमध्ये चर्चा झाली. या चर्चेवेळी खोलीमध्ये कोणालाही प्रवेश दिला गेला नाही, त्यामुळे नेमकं या चर्चेत काय घडले याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. मात्र आगामी काळातील निवडणुकाविषयी चर्चा झाल्याचा अंदाज कार्यकर्त्यांकडून लावला जावू लागला आहे.

You might also like