अखेर बाळू धानोरकरांच्या पाठीवर काँग्रेसचा हात

Untitled design
Untitled design

चंद्रपुरमधून तिकीट फिक्स, किशोर गजभिये रामटेकमधील काँग्रेसचे उमेदवार

चंद्रपूर प्रतिनिधी | सुरज घुमे

चंद्रपुरात शुक्रवारी माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या नावाला कमालीचा विरोध झाला. हा विरोध पक्षश्रेष्ठींनी विचारात घेऊन धानोरकर यांच्या नावावर रविवारी सायंकाळी शिक्कामोर्तब केले. धानोरकरांच्या उमेदवारीने भाजपसमोर आता खऱ्या अर्थाने काँग्रेसने तगडे आव्हान उभे केल्याचेही बोलले जात आहे.

शिवसेना-भाजपची युती झाल्यापासूनच बाळू धानोरकर हे अस्वस्थ होते. त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढावी, अशी व्युहरचना काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी आखली होती. मात्र गटबाजीमुळे त्यांच्या उमेदवारीला अंतर्गत विरोध झाला. परिणामी संभाव्य उमेदवार म्हणून नागपूरचे विशाल मुत्तेमवार यांचे पुढे आले होते. नागपूर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागतही करण्यात आले. यासोबतच बाहेरचा उमेदवार लादू नका, असा विरोधाचा सूर मतदार संघातून उमटला. यामुळे मुत्तेमवारांना माघार घेतली.

यानंतर पुन्हा नव्या उमेदवाराचा शोध सुरू झाला. अशातच माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब करून त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा देखील केली. परंतु विनायक बांगडे हे या निवडणुकीत तग धरू शकणार नाही. त्यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन धानोरकर यांना ती बहाल करावी, असा मागणीवजा विरोध मतदार संघात सुरू झाला.

सोशल मीडियावर हा विरोध टोकाला गेला होता. मतदार संघातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशा इशाराही दिला जात होता. हा विरोध पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचला. यानंतर पुन्हा चंद्रपूरचा उमेदवार बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू झाल्या. वरिष्ठ नेत्यांच्या रविवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: हस्तक्षेप करून बाळू धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आल्याचे समजते.

दुसरीकडे रविवारी भाजपाच्या दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयातून प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रकात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपाने भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. भाजपच्या दिल्लीतील केंद्रीय कार्यालयातून पत्रक काढल्यानंतर निवडले गेलेले मेंढे हे एकमेव उमेदवार आहेत.

दरम्यान रामटेक मतदारसंघातून किशोर गजभिये यांना काँग्रेसने संधी दिली आहे. अशोक चव्हाण व मुकुल वासनिक यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.