सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोधळे
महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची अखेर बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांची नियुक्ती झाली आहे. याबाबतचे आदेश आज प्राप्त झाले. खेबुडकर यांच्या बदलीसाठी सत्ताधारी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यांना अखेर यश आले. खेबुडकर यांची बदली झाल्यानंतर महापालिकेत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
रवींद्र खेबुडकर यांची ९ जून २०१६ रोजी आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करताना त्यांना एक वर्षाचा कालावधी दिला होता. एक वर्षाची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा जून २०१९ पर्यंत दोन वर्षांची मुदतवाढ दिली होती. या जूनमध्ये त्यांची मुदत संपली होती. मात्र त्यांच्या बदलीची अथवा मुदतवाढीचे आदेश महापालिकेला प्राप्त झाले नव्हते. या काळातच सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या कारभाराला त्रस्थ होऊन आयुक्त हटाव मोहिम सुरू केली होती. सुरेश खाडे, आ.सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवकांनी आयुक्तांच्या बदलीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
आयुक्तांना सत्ताधारी भाजपचा विरोध वाढल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आयुक्त खेबुडकर यांच्या बदलीचा आदेश अखेर निघाला. खेबुडकर यांना महापालिकेतून कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांच्या मूळ प्रशासकीय महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्यात आले आहे. मात्र त्यांना अद्याप नियुक्ती दिलेली नाही. त्यांच्या जागी नागपूर महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडनीस यांची नियुक्ती केली आहे. कापडनीस यांनी यापूर्वी सांगली महापालिकेत सेवा बजावली आहे. तीन वर्षे त्यांनी मिरजेचे उपायुक्तपद सांभाळले होते. त्यांना महापालिकेच्या विविध योजनांची माहिती आहे. त्यामुळे आता विकासकामांना गती येण्याची शक्यता आहे.