काश्मिरच्या मुद्द्यावरुन नरेंन्द्र मोदींची काँग्रेसवर टीका
अहमदनगर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
काँग्रेस पक्ष काश्मिरला भारतापासून तोडण्याचे षडयंत्र रचत असून यामधे राष्ट्रवादी त्यांना साथ कशी काय देते असा प्रश्न पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत केला. भाजपचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डाॅ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांंची नगरमध्ये जंगी सभा झाली. यावेळी मोदी बोलत होते.
मोदी म्हणाले “काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा लोकांची साथ देत आहेत ज्यांना जम्मु आणि काश्मिरसाठी वेगळा पंतप्रधान हवाय. काँग्रेसचं ठिकंय पण शरदराव पवरांना काय झालंय असा प्रश्न करुन मोदींनी शरद पवारांच्या भुमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. शरदराव तुम्हीतर देशासाठी काँग्रेस सोडली होती. देशात दोन पंतप्रधान पाहिजेत यावर तुम्ही कधीपर्यंत शांत राहणार?
तुमच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवलं आहे मात्र तुमचे साथीदार देशाला विभागण्याचं काम करत आहेत. पक्षाचं राष्ट्रवादी असं नाव लोकांच्या डोळ्यांत धुळ फेकण्याकरता ठेवलं आहे काय असं म्हणुन मोदींनी पवारांवर निशाणा साधला. शरदराव तुम्ही शिवछत्रपतींच्या भुमितले, तुम्हाला झोप कशी येते? असंही मोदी यावेळी म्हणाले.