औरंगाबाद – सध्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम डेपोमध्ये पेट्रोल, डिझेलला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यातच टॅंकरचा तुटवडा असल्याचे कारण देत इंधनाचा पुरवठा कमी करण्यात येत आहे. कोरोनानंतर अपेक्षेपेक्षा जास्त मागणी नोंदविलेली नसताना, तुटवडा कसा निर्माण झाला, हे समजून घेण्यास डीलर्स अपयशी ठरत आहेत. हे असेच सुरू राहिल्यास भविष्यात पेट्रोल, डिझेलचे 15 ते 20 रुपयांनी वाढण्याची शक्यता पीडीएचे सचिव अखिल अब्बास यांनी पत्रकार परिषदेत वर्तविली आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, कोरोनानंतर एकही पेट्रोल पंप नव्याने सुरू झालेला नाही. इंधनाच्या विक्रीत वाढ किंवा घट देखील झालेली नाही. असे असताना पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम डेपोकडून शहराला कमी व विसंगत प्रमाणात इंधनाचा पुरवठा केला जात आहे. परिणामी, बहुतांश पेट्रोल पंप कोरडे पडत आहेत. वारंवार विनंती करून तसेच आगाऊ पेमेंट करून देखील मुबलक प्रमाणात इंधन पुरवठा केला जात नाही. याबाबत इंधन डेपोकडून देखील अधिकृतरीत्या माहिती दिली जात नाही. केवळ तोंडी किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज करून तुटवडा असल्याची माहिती दिली जाते. त्यामुळे ग्राहक, इंधन चालक-मालक संघटनांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी हस्तक्षेप करून मार्ग काढावा अशी मागणी संघटनेमार्फत यावेळी करण्यात आली आहे.
सध्या राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे शासनाला शहराला अपुऱ्या प्रमाणात इंधन पुरवठा प्रतिलिटर मागे 15 ते 20 रुपये नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी जाणीवपूर्वक इंधनाचा पुरवठा कमी प्रमाणात केला जात असल्याचा आरोप अब्बास यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात इंधन दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे पेट्रोल पंप चालक-मालक संघटनेचे सचिव अखिल अब्बास यांनी यावेळी म्हटले.