नवी दिल्ली । पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (MIS), सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम (SCSS) आणि टर्म डिपॉझिटशी संबंधित गुंतवणूकीचे नियम 1 एप्रिलपासून बदलणार आहेत. या गुंतवणूक योजनांवर मिळणारे व्याज आता रोख स्वरूपात मिळणार नाही. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे बचत खाते असणे आता आवश्यक करण्यात आले आहे. म्हणजेच ज्यांच्याकडे बचत खाते नाही, त्यांना या योजनांमध्ये गुंतवणूक करताना बचत खाते उघडावे लागेल.
यासोबतच गुंतवणुकीच्या योजनाही खात्याशी लिंक कराव्या लागतील. ज्या गुंतवणूकदारांकडे आधीपासूनच बचत खाते आहे आणि त्यांनी अद्याप या योजना त्यांच्या खात्याशी जोडल्या नसतील तर त्यांनी तसे करणे आवश्यक आहे. या योजनांचे व्याज आता बचत खात्यातच दिले जाईल.
31 मार्चपर्यंत लिंक मिळवा
जर तुम्हीही या योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल आणि तुमचे बचत खाते त्याच्याशी लिंक केले नसेल, तर हे काम 31 मार्चपर्यंत करा. बचत खाते लिंक करण्याची शेवटचो तारीख 31 मार्च 2022 आहे. या वेळेपर्यंत तुम्ही तसे केले नाही, तर तुम्ही पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममध्ये क्रेडिट किंवा चेकद्वारेच व्याजाचे पैसे घेऊ शकाल. ज्येष्ठ नागरिकांना जेव्हा त्यांची गुंतवणूक योजना बचत खात्याशी जोडली जाईल तेव्हाच त्यांना व्याज मिळेल.
लिंक करण्यासाठी काय करावे लागेल ?
तुमच्या बचत खात्याशी तुमच्या गुंतवणूक योजना लिंक करण्यासाठी तुम्हाला SB-83 हा फॉर्म भरावा लागेल. मंथली इन्कम स्कीम पासबुक आणि बचत खाते पासबुकसह व्हेरिफिकेशनसाठी हा फॉर्म पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा लागेल. बचत खात्याला गुंतवणूक योजनांशी जोडून, खातेदार पोस्ट ऑफिसला न जाता कधीही त्यांचे व्याजाचे पैसे काढू शकतात. तसेच पैसे काढण्यासाठी वेगळा फॉर्म भरण्यापासून त्यांची सुटका होणार आहे.
फसवणूक टाळण्यासाठी नियमांमध्ये बदल
पोस्टल डिपार्टमेंटने फसवणूक रोखण्यासाठी, मनी लॉन्ड्रिंगला आळा घालण्यासाठी आणि डिजिटल ट्रान्सझॅक्शनना प्रोत्साहन देण्यासाठी नियमांमध्ये हा बदल केला आहे. पोस्टल डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार, मंथली इन्कम स्कीमच्या काही खातेदारांनी त्यांचे बचत खाते व्याजाच्या क्रेडिटसाठी लिंक केलेले नाही. अनेक खातेदारांना व्याज मिळत असल्याची माहितीही नसते. व्याजाचे पैसे त्यांच्या पोस्ट ऑफिसच्या खात्यातच राहतात.