कोल्हापूर प्रतिनिधी | शहरात उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारने दोन उपायुक्त व एक सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची कोल्हापूर महापालिकेकडे नियुक्ती केली आहे. सोमवारी (ता. १२) सरकारचे सहसचिव एस. एस. गोखले यांनी आदेश काढले. त्यानुसार पुणे महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे, संतोष भोर तर पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला.
महापुरामुळे शहरात आरोग्य, पाणी, वीज, रस्ते अशा सर्वच आपत्कालीन स्थितीचा बोजवारा उडाला आहे. नागरिकांना महापुराच्या विळख्यातून बाहेर काढण्याबरोबर त्यांना सर्व सुविधा देण्यासाठी अतिरिक्त अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे.
राज्याचे सहसचिव गोखले यांनी त्यांच्या तात्पुरत्या नियुक्तीचे आदेश काढले. त्यानुसार पुणे महापालिकेचे उपायुक्त मुठे व भोर यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त अष्टीकर यांनी पदभार स्वीकारला. महापालिकेच्या नियमित सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना दमदाटी करुन पिण्याच्या पाण्याचे टँकर पळवले जात आहेत. त्याला चाफ लावल्यासाठी तीनपैकी एका अधिकाऱ्यांकडे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन देण्यात येणार आहे.