हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या (AICC ) वतीने देशभरात लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन (LDM) हा एक महत्वाकांशी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत देशभरात जे SC आणि ST वर्गासाठी लोकसभेचे राखीव मतदारसंघ आहेत. अशा मतदारसंघासाठी AICC चे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणूगोपाल यांच्यावतीने काल निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये सातारा येथील काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्या प्राची कांबळे ताकतोडे यांची सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी संविधानिक समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्या प्राची कांबळे ताकतोडे या गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात काम करत आहेत. सध्या त्या महाराष्ट्र प्रदेश युवती काँग्रेसच्या सचिव म्हणून काम पाहत आहेत. त्या पक्षाच्या कामात नेहमीच अतिशय सक्रिय असतात. जमिनीवरची कार्यकर्ती म्हणून त्यांची ओळख असून अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना मोठी जबादारी दिली आहे. दिलेली जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडणार असा विश्वास प्राची कांबळे यांनी व्यक्त केला आहे.
प्राची कांबळे ताकतोडे यांच्या नियुक्तीबद्दल काँग्रेसचे नेते तथा आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा कॉंग्रेस, युवक काँग्रेस,महिला काँग्रेस सेवादल,अल्पसंख्यांक सेल, ओबीसी सेल तसेच सर्व सेलमधील पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.