विशेष प्रतिनिधी । मुंबई
३५ ते ४० वर्षांपूर्वी धुळय़ातील सर्वसामान्य कुटुंबातून मुंबईत पोलीस सेवेत रुजू झालेले चकमकफेम निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवत आहेत. गेल्या ३५ वर्षांच्या सेवेत जवळपास पावणे दोन कोटींची मालमत्ता जमवल्याची माहिती शर्मा यांनी उमेदवार प्रतिज्ञापत्रात दिली आहे. मात्र, शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती यांची मालमत्ता तब्बल २४ कोटींच्या घरात आहे. त्याहून विशेष म्हणजे, शर्मा दाम्पत्याने स्वतंत्रपणे विविध आस्थापना, व्यक्तींना तब्बल १३ कोटींहून अधिक रुपये कर्ज वा आगाऊ रकमेपोटी दिल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
१९८३ मध्ये पोलीस दलात सहभागी झालेले शर्मा धुळ्यातील सर्वसामान्य कुटुंबातून आहेत. पोलीस दलातून निवृत्त होताना त्यांच्या नावावर ११३ चकमकींची नोंद आहे. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शर्मा यांची १ कोटी ८१ लाख तर त्यांच्या पत्नी स्वीकृती यांची २४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. शर्मा यांच्या नावे स्थावर मालमत्ता नाही. मात्र स्वीकृती यांच्या नावे शेतकी भूखंड, व्यावसायिक गाळे आणि घर अशी २० कोटी ३७ लाख इतकी स्थावर मालमत्ता आहे.