Prajakta Mali : सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे अभिनेत्रीने केला नावात बदल; आता प्राजक्ता माळी नव्हे तर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Prajakta Mali) मराठी कला विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला जातो. मालिका विश्वातून प्रसिद्ध झालेल्या प्राजक्ताने सिनेविश्वात देखील घट्ट पाय रोवले आहेत. आज तिची स्वतःची एक विशेष ओळख आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हा’ यांसारख्या मालिकांसोबतच ‘रान बाजार’ सारखी दमदार वेब सिरीज आणि अनेक मराठी सिनेमे प्राजक्ताने गाजवले आहेत. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतेय. त्यामुळे प्राजक्ताचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो तिला प्रेमाने ‘प्राजू’ म्हणतो. चाहत्यांच्या लाडक्या प्राजुने तिच्या नावाबाबत एक मोठा निर्णय घेत सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या खाजगी तसेच प्रोफेशनल आयुष्यातील अनेक अपडेट देताना दिसते. नुकतीच तिने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ‘प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी’ असे लिहिलेले दिसत आहे. अर्थात तिने आपल्या नावात केलेला बदल या पोस्टच्या माध्यमातून दर्शवला आहे. आपले नाव बदलण्याबाबत तिने एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे.



काय म्हणाली प्राजक्ता माळी? (Prajakta Mali)

या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, ‘नमस्कार मी प्राजक्ता श्वेता माळी (Prajakta Mali) , काय झालं, अहो हो हो बरोबर नांव ऐकलं तुम्ही, आता आपल्या नावा नंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे, अहो हे मी नाही आपलं सरकार बोलत आहे. “आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्वाचं आहे, तितकंच आईचं नाव देखील महत्वाचं आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास मंत्री “अदिती वरदा सुनील तटकरे ताई यांनी. आता यापुढे सर्व शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावणं गरजेचं आहे. तर आहे ना अभिमानाची गोष्ट….. धन्यवाद अदिती तटकरे”.

सरकारचा निर्णय

गेल्या महिन्यात आपल्या कागदपत्रांमध्ये वडिलांप्रमाणे आईचे नाव देखील लावणे बंधनकारक असल्याचे घोषित करण्यात आले होते. हा निर्णय ११ मार्च २०२४ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला. त्यानुसार १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या बालकांच्या नावाची नोंदणी करताना वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लावले जाणार आहे. अर्थात, सुरुवातीला बालकाचे नाव त्यानंतर आईचे नाव मग वडिलांचे नाव आणि त्यानंतर आडनाव अशी नावाची नोंद होईल. या निर्णयासाठी शासकीय अध्यादेशदेखील काढण्यात आला होता. यानुसार आता अनेक लोक आपल्या नावात वडिलांआधी आईचे नाव जोडताना दिसत आहेत.